या तिसऱ्या खंडात जे लेख घेण्यात आले आहेत ते संकीर्ण आहेत. पण किरकोळ नक्कीच नाहीत. गांधीजी आणि भाषा ही चर्चाही तितकीच महत्त्वाची, जितकी गांधीजी आणि मार्क्सवाद...

माझ्यावर मराठी भाषेचे उपकार आहेत. मी आणि गांधीजी दोघेही गुजराथी. गांधी समजण्यासाठी महाराष्ट्राचा राजकीय-सामाजिक पट, त्यावर पडलेली गांधींची (समर्थक-विरोधक) छाप, एकूण महाराष्ट्रातील गांधीविषयक वैचारिक चिंतन वाचणे आवश्यक आहे. मराठीत खूप वाचलेले असल्याने मला त्याचा लाभ झाला, हे ही प्रस्तावना लिहिण्यामागचे पहिले कारण. मला हे कबूल केले पाहिजे की, मराठीइतका बहुआयामी विमर्श माझ्या मातृभाषेत, गुजराथीत झालेला नाही.......

गांधीजींबाबत ज्या दंतकथा ऐकायला येत होत्या, त्यांची भारतीय जनतेला प्रचीती आली. भारताच्या प्रजेला हे लक्षात आले की, हा ‘दमदार’ माणूस आमच्या कामाचा आहे!

गुंता असा होता की, माणूस ‘दमदार’ तर होता आणि आता तर तो जनतेलाही आपल्या कामाचा वाटायला लागला होता. लक्षात घ्या; बिनोबा भावे, घनशामदास बिर्ला, वल्लभभाई पटेल हे जेव्हा असे म्हणाले, त्या वेळेस तेही अगदी सामान्यातीलच होते, नेते झालेले नव्हते. जवळपास असेच मत बऱ्याच लोकांचे होते, जे पुढे जाऊन राजकीय नेता किंवा गांधीजींचे सहकारी वा प्रतिष्ठित महानुभाव झाले. प्रस्थापित नेत्यांसमोर प्रश्न हा होता की, या माणसाचे करायचे काय?.......